57 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव, आठ पारितोषिके घोषित

https://ift.tt/4cFwtg9

मराठी चित्रपट व्यवसायाला मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने 1962 पासून चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाला सुरवात केली आहे. मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता तसेच चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना उत्तेजन देण्याच्या हेतूने प्रतिवर्षी मराठी चित्रपट महोत्सवाचे भव्य स्वरुपात आयोजित करण्यात येते. 57 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन-तीन नामांकनांची शिफारस तसेच 7 तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.

 

अंतिम फेरीसाठी पांघरुण, ताजमाल, आनंदी गोपाळ, बाय (Y), बार्डो, प्रवास, मिस यु मिस्टर,बस्ता, स्माईल प्लीज, बाबा या दहा चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन झाले आहे. प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करिता माईघाट, मनफकिरा, झॉलीवूड या तीन चित्रपटांचे आणि प्रथम पदार्पण दिग्दर्शनासाठी घोडा, वेगळी वाट, आटपाडी नाईटस् यांचे नामांकन घोषित करण्यात आले आहे.

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षात चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण 89 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका 57 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून रमेश साळगांवकर, अरुण म्हात्रे, किशू पाल, श्रीरंग आरस, प्रशांत पाताडे, विजय कदम, मनोहर आचरेकर, जयवंत राऊत, प्रदीप पेडणेकर, नंदू वर्दम, प्रकाश जाधव, रमेश मोरे, कुमार सोहनी आणि दिलीप ठाकूर यांनी काम पाहिले.

 

घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून संबंधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून हे पुरस्कार चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत मे 2022 मध्ये समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील. पुरस्कार तसेच नामांकन प्राप्त सर्व कलाकार, तंत्रज्ञांचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी अभिनंदन केले आहे. 

 



from मनोरंजन https://ift.tt/Opcie6U

Post a Comment

Previous Post Next Post