‘हर हर महादेव’ चित्रपटावरून सध्या राजकारण आणि वाद दोन्हीही रंगताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी (7 नोव्हेंबर) रात्री ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये सुरू असलेला हर हर महादेवचा शो बंद पाडला.
जितेंद्र आव्हाड यांनी एक फेसबुक पोस्ट लिहित आपली भूमिकाही मांडली.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे-
"हा चित्रपट ऐतिहासिक दस्तऐवज नाही" अशी कायदेशीर आणि ऐतिहासिक जबाबदारी झटकून टाकणारा disclaimer एकदा पडद्यावर दिसला की नंतर "सिनेमॅटिक लिबर्टी" ह्या नावाखाली त्या सिनेमात इतिहासाची यथेच्छ मोडतोड आणि विपर्यास करायचे जणू काही लायसन्स तो सिनेमा बनवणाऱ्या लोकांना मिळून जाते.
"पावनखिंड" या सिनेमात बाजीप्रभू देशपांडे एखाद्या थिल्लर मवाल्यासारखे मुघल सरदाराला "चल" असे म्हणतात तर "हर हर महादेव" सिनेमात बाजीप्रभू "घंटा!" अशी टपोरी भाषा वापरताना दिसतात.
पावनखिंड सिनेमात बाजीप्रभूंच्या घरातील विधवा स्त्रिया ज्याप्रकारचं आलवण चित्पावन विधवा नेसायच्या त्याप्रकारचं आलवण नेसताना दिसतात, जेव्हा की बाजीप्रभू हे चित्पावन ब्राह्मण नव्हते तर कायस्थ होते.
"सरसेनापती हंबीरराव" या सिनेमात हंबीरराव एका मुघल सरदारासोबत डायलॉगबाजी करत मैत्रीपूर्ण कुस्ती करत आहेत आणि कडेने मावळे प्रोत्साहन देत आहेत.
खुद्द महाराज, जिजाऊ, तान्हाजी, बाजीप्रभू, हंबीरराव यांच्या नावाने काहीही खपवून नेमके काय साध्य करायचे आहे हा चिंतनाचा विषय आहे. "हर हर महादेव" या सिनेमात तर विकृतीचा एक वेगळाच कळस गाठला गेला. बाजीप्रभू देशपांडे चक्क महाराजांचे एकेरी नाव घेत त्यांच्याशी युद्ध करत आहेत. एका स्वामीनिष्ठ मावळ्याचा हा केवढा अपमान आहे! या सिनेमात बाजीप्रभू ही व्यक्तिरेखा खुद्द महाराजांपेक्षाही मोठी दाखवली आहे. महाराजांना प्रत्येक गोष्ट जणू काही बाजीप्रभूच शिकवत होते आणि महाराजांना, जिजाऊंना किंवा इतर दरबारी लोकांना काहीच माहीत नव्हते इतक्या दर्जाचा हा विपर्यास आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या शो बंद पाडण्याच्या कृतीला तसेच त्यांनी चित्रपटावर घेतलेल्या आक्षेपांना 'हर हर महादेव'चे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.
आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त स्वत:ला म्हणतो आणि जर त्यांचेच विचार समजून न घेता आपण ऐकमेकांवर शिवीगाळ करत राहिलो तर आपण महाराष्ट्राला कुठे ठेवत आहोत?’ असं अभिजीत देशपांडे यांनी म्हटलं.
हा वाद केवळ हर हर महादेव या चित्रपटापुरताच आहे का? या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. दोनच दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत इतिहासाच्या विकृतीकरणाचा मुद्दा मांडला होता...निमित्त होतं दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाच्या लाँचिंगचं.
बुधवारी (2 नोव्हेंबर) महेश मांजरेकर यांनी त्यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार हा शिवाजी महाराजांच्या, तर प्रतापराव गुजरांच्या भूमिकेत अभिनेते प्रवीण तरडे आहेत.
या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत आपला विरोध व्यक्त केला.
संभाजीराजे छत्रपती यांनी महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर याच्या पात्राचा फोटोही दाखवला, ते म्हणाले, "हे मावळे वाटतात का?"
"माझी सरकारला विनंती आहे की असे सिनेमा तयार होणार असतील तर सरकारने इतिहासतज्ज्ञांची समिती नेमावी. माझी सगळ्या इतिहासकारांना आणि अभ्यासकांना विनंती आहे की त्यांनीही या मध्ये लक्ष घालावं," असंही संभाजीराजे यांनी म्हटलं.
गेल्या काही काळात मराठीमध्ये शिवकालीन इतिहास सांगणाऱ्या सिनेमांची लाटच आली आहे. या सिनेमांची यादीच बरीच मोठी आहे... फर्जंद, हिरकणी, फत्ते शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, शिवप्रताप- गरुडझेप, सरसेनापती हंबीरराव, हर हर महादेव...
यांपैकी काही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती, बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. पण त्याचबरोबर या सिनेमातून खरंच इतिहास मांडला जातोय का? ऐतिहासिक कालखंडाचा विचार करून या चित्रपटातील व्यक्तिरेखा साकारल्या जात आहेत की या सिनेमांच्या माध्यमातून आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचा किंवा राजकीय अजेंडा पुढे ढकलण्याचा प्रयत्न होतो?
या प्रश्नांची उत्तरं शोधण्याआधी आपण दोन सिनेमांमधील प्रसंगांचा विचार करूया. हे प्रसंग प्रातिनिधिक म्हणून पाहता येतील.
पहिला सिनेमा आहे तान्हाजी (सिनेमा हिंदी असला, तरी विषय शिवाजी महाराजांशी संबंधित असल्यामुळे उदाहरणासाठी घेतला). यामध्ये कोंढाण्याच्या मोहिमेवर आपणच जाणं कसं गरजेचं आहे, हे शिवाजी महाराजांना समजावण्यासाठी तान्हाजी (तानाजी नाही!) वेश बदलून साधू बनून येतो आणि महाराजांच्या दिशेने दंड भिरकावतो...
तान्हाजी हे चित्रपटातील मुख्य पात्र होतं, त्याची स्वराज्याप्रति निष्ठा अधोरेखित करणं गरजेचं होतं, हे मान्य केलं तरी राजशिष्टाचाराचा विचार करता शिवाजी महाराजांच्या मावळ्याची ही कृती औचित्यभंगाची नव्हती का?
याच सिनेमात स्वराज्याचा भगवा झेंडा दाखवला आहे आणि त्यावर चक्क ‘ऊँ’ आहे. शिवाजी महाराजांच्या झेंड्यावर किंवा राज्यकारभारात अशा कोणत्याही प्रतीकांचा वापर केल्याचं ऐकिवात नाही...
दुसरा सिनेमा म्हणजे ज्यावरून सध्या वाद सुरू आहे, तो हर हर महादेव हा चित्रपट. याच्या ट्रेलरमध्येच एक इंग्रजी अधिकारी आपल्याला मराठी येत नसल्याचं सांगतो. त्यावर शिवाजी महाराज त्याला सुनावतात की, मग मराठी शिकायचं. ‘मुलूख माझा, तर भाषाही माझीच’
सध्याच्या काळातील हा भाषिक अजेंडा, तेव्हा शिवाजी महाराजांनी राबवला असेल का?
यातूनच इतिहासाचा विपर्यास केला जात आहे का, हे वाटणं स्वाभाविक आहे. त्याचबरोबर क्रिएटिव्ह लिबर्टीच्या नावाखाली या विपर्यासातून राजकीय-सामाजिक विचारधाराही सोयीस्करपणे रेटली जाते का? हाही मुद्दा उपस्थित होतो.
इतिहासाच्या अभ्यासक श्रद्धा कुंभोजकर यांनी यावर सविस्तरपणे भाष्य केलं.
“आपण जेव्हा क्रिएटिव्ह लिबर्टीबद्दल बोलतो, तेव्हा इतिहासकारही ती घेत असतात. पण ते अभ्यास करून, तथ्यांचा अन्वयार्थ लावून सर्जनशीलतेचा वापर करत इतिहास लिहितात. चित्रपटातही कुणाची तरी कथा आपल्या आकलनानुसार सादर केली जाते.”
मग इतिहासकाराचं क्रिएटिव्ह स्वातंत्र्य आणि चित्रपटनिर्मात्यांचं स्वातंत्र्य यामध्ये नेमका फरक काय हेही श्रद्धा कुंभोजकर समजावून सांगतात.
“इतिहासकार सत्य हे तीन-चार पद्धतीने पडताळून पाहतो. एखाद्या गोष्टीला अस्सल पुरावा आहे का आणि तो विश्वासार्ह आहे का या निकषांवर सत्य तपासलं जातं आणि मग ते क्रिएटिव्हली मांडलं जातं. चित्रपटात जर आपण सत्यनिष्ठेवर अधिक भर दिला तर प्रेक्षकांना तत्कालिन ऐतिहासिक वास्तवाशी जोडून घेणं अशक्य होईल. त्यामुळे ते रंजक पद्धतीने मांडलं जातं.”
रंजकता आणि विपर्यास यांतली सीमारेषा नेमकी कुठे पुसट होते? श्रद्धा कुंभोजकर यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं, “जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट विचारधारेने प्रेरित होऊन घटनांचा अन्वयार्थ लावता, आणि तो समाजात घातक विचार पसरवतो, तेव्हा सत्याचा विपर्यास होतो.”
सध्याच्या काळात ज्या संख्येनं हे चित्रपट येत आहेत ते पाहता, सिनेमातून मांडला जाणारा इतिहास हाच खरा हे मानण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी क्रिएटिव्ह लिबर्टी आणि ऐतिहासिक घटनांचा विपर्यास यांची सरमिसळ झाल्यास काय परिणाम होऊ शकतात?
श्रद्धा यांनी सांगितलं, “ मूल्यात्मकदृष्ट्या तथ्यांचा विपर्यास ही गोष्ट चांगली नाहीये. आपल्याकडे इतिहास हा वस्तुनिष्ठतेपेक्षाही कल्पनेतून समजून घेण्याकडे जास्त कल आहे. अगदी पुस्तकांचंही उदाहरण घेतलं तर पूर्णपणे ऐतिहासिक मांडणी करणाऱ्या काल्पनिक कादंबऱ्या वाचण्याकडे अधिक कल असतो. अशा परिस्थितीत अजेंडा रेटणं फावतं. ते समाजात दुही आणि द्वेष पसरवतं. असं अजेंडा रेटण्यासाठी इतिहास राबवणं हे कोणत्याही विचारधारेत होऊ शकतं. त्यामुळे खरा इतिहास हा इतिहासकारांकडून समजून घेणं गरजेचं आहे .सिनेमानाटकांतून इतिहास नाही, तर मनोरंजन मिळतं याचं भान आपण ठेवायला हवं.”
‘मध्यममार्ग शोधण्याची गरज’
सिनेमॅटिक लिबर्टीबद्दल लेखक-चित्रपट अभ्यासक गणेश मतकरी यांनी काही उदाहरणं मांडली आणि त्याचबरोबर ऐतिहासिक सिनेमाच्या संदर्भात ती कशी, किती घ्यावी याबाबत म्हटलं की, अनेक कथा, कादंबऱ्या, चित्रपट, मालिका या इतिहासाचे संदर्भ घेतात आणि त्यातून आपली कलाकृती घडवतात. नारळीकरांच्या ‘गंगाधरपंतांचे पानीपत’ या कथेत मराठ्यांनी पानिपत युद्धात विजय मिळवला असता तर काय झालं असतं अशी कल्पना होती. फिलिप के डिकच्या ‘द मॅन इन द हाय कॅसल’ या कादंबरीत दोस्तराष्ट्र दुसरं महायुद्ध हरतात आणि अमेरिकेवर जपान आणि जर्मनीचा कब्जा होतो. टॅरॅन्टिनोच्या ‘इनग्लोरिअस बास्टर्ड्स’मधे हिटलरला वेळेआधीच संपवली जातं. या कलाकृती ऑल्टरनेट हिस्ट्री मांडणाऱ्या आहेत, त्यामुळे त्यात खरोखरच इतिहास जसा घडला तसा न सांगता तो कसा घडू शकला असता यावर बोललं जातं. आपल्या कल्पनाशक्तीने त्यातून नवी मांडणी केली जाते.
गणेश मतकरी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे की, ऐतिहासिक चित्रपटांसाठी पुरेसा रिसर्च असावा ही मागणी रास्त आहे, त्याबरोबरच जे घडलं त्याचा विपर्यास केला जात नाही, कोणा मोठ्या व्यक्तीरेखेचा अपमान होत नाही, याची काळजीही घ्यायला हवी.
मराठेशाहीचा इतिहास (आणि एकूणच इतिहास ) हा संवेदनशील विषय असतो हे लक्षात घेऊन निर्माते, दिग्दर्शक, लेखक यांनी काम करावं. लागेल तेव्हा तज्ञांची मदतही घ्यावी. पण शेवटी ती सत्याचा आधार घेणारी कल्पित मांडणी आहे याचा विसर कोणालाच पडू नये. प्रत्येक गोष्टीचं अप्रूवल घ्यावं लागलं आणि गोष्टी वेगळ्या पद्धतीने मांडण्याची शक्यताच संपून गेली, तर ते देखील योग्य होणार नाही. शेवटी यात काहीतरी मध्यममार्ग शोधला जावा.
मराठी सिनेमा या साच्यात अडकला आहे का?
या सगळ्या वाद-विवादांच्या पलिकडे जाऊन विचार करायचा म्हटलं तरी ऐतिहासिक सिनेमांची संख्या, दोन चित्रपटांच्या प्रदर्शनामधला कालावधी पाहता आता मराठी सिनेमा ठराविक चक्रात अडकला आहे का? असाही प्रश्न पडतो. लेखक आणि चित्रपट अभ्यासक गणेश मतकरींनी याबद्दल बोलताना म्हटलं की, मराठी सिनेमांचा स्वातंत्र्योत्तर काळातला इतिहास पाहता वेळोवेळी असे वेगवेगळ्या विषयांचे क्लस्टर्स तयार झालेले दिसतात. म्हणजे तमाशापटांची एक लाट आली, त्यानंतर 80-90 च्या दशकात विनोदीपट आले. पण या दोन्ही केसेसमधे आधी यश मिळूनही पुढे चित्रपटउद्योग अडचणीत आला. तोचतोचपणामुळे प्रेक्षक दुरावत गेले. गेल्या वीसेक वर्षात मराठी सिनेमात काही नवीन प्रयोग व्हायला लागले आहेत, सिनेमा चांगल्या अर्थाने बदलताना दिसतो आहे, पण आता अशा तोचतोचपणाच्या चक्रात अडकण्याचा धोका जाणीवपूर्वक टाळायला हवा. हे असं होण्याचं एक महत्वाचं कारण हे व्यावसायिक स्पर्धा आणि आर्थिक गणितं असल्याचं मत गणेश मतकरी यांनी व्यक्त केलं.
“मुंबई हे मराठी चित्रपटांप्रमाणेच बॉलिवूडचंही केंद्र आहे. त्यामुळे मराठी सिनेमांना आधीपासूनच हिंदीची स्पर्धा होती आणि आता दाक्षिणात्य चित्रपटांची स्पर्धा आहे. इतर राज्यांमधे कन्नड, मल्याळम, बंगाली अशा त्या त्या प्रादेशिक भाषेच्या चित्रपटाला प्रेफरन्स मिळतो, पण आपल्याकडे तसं होत नाही. महाराष्ट्रात आणि खासकरुन मुंबईसारख्या शहरात प्रामुख्याने हिंदी आणि इतर भाषांमधले चित्रपटही चालतात. अशावेळी मराठी निर्मात्यांना दिग्दर्शकांना वाटणारी सिनेमा चालण्याबद्दलची असुरक्षितता वाढू शकते. त्यामुळे मग एखाद्या विषयावरचा चित्रपट चालला, तर त्याच विषयावरचा दुसरा सिनेमाही चालेल असे हिशेब केले जातात,” असं मतकरी म्हणतात. “खरं तर विषय रिपीट करण्यात धोका अधिक असतो, पण हे चटकन लक्षात येत नाही.” कमीत कमी गॅप ठेवून सातत्याने एकाच विषयावरचे चित्रपट रिलीज होण्यामधला धोकाही मतकरी अधोरेखित करतात.
थोडक्या काळात एवढ्या मोठ्या संख्येनं एकाच विषयावर येणारे चित्रपट चालवून दाखवण्याची प्रेक्षकांची क्षमता आहे का? दुसरं म्हणजे या सगळ्या शिवकालीन साहसपटांच्या / युद्धपटांच्या लाटेत छत्रपती शिवाजी महाराजांवर केंद्रीत झालेला चरित्रपट काढण्याचा कोणी गांभीर्याने प्रयत्न केला तर त्याचा वेगळेपणा प्रेक्षकाच्या लक्षात येईल का ? असे प्रश्न गणेश मतकरी उपस्थित करतात.
वाद-विवाद बाजूला ठेवून हे चित्रपट काही प्रमाणात व्यावसायिक यश देत आहेत हे मान्य केलं तरीही या सिनेमांमुळे मराठी चित्रपटसृष्टीसमोर दुहेरी आव्हान उभं केलं असल्याचं दिसतं.
एका बाजूला मनोरंजनाच्या माध्यमातून इतिहास मांडताना वास्तवाचं भान कसं सुटणार नाही हे पाहणं गरजेचं आहे. दुसरीकडे आशय आणि विषयाच्यादृष्टीने एकाच चौकटीत अडकून न पडता व्यावसायिक गणितं सांभाळणही आवश्यक आहे.
from मनोरंजन https://ift.tt/EN3exFy
Post a Comment