जिंदगी दो पल की’ चे प्रसिद्ध गीतकार नासिर फराज यांचे निधन

https://ift.tt/01GlIt8

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार नासिर फराज यांचे निधन झाले. नासिर यांनी बॉलीवूड चित्रपटांसाठी एकापेक्षा एक गाणी लिहिली आहेत. त्यांनी आपल्या गीतांनी रसिक श्रोत्यांची मने जिंकली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नासिर आजारी होते. नासिर एका गंभीर आजाराशी झुंज देत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना हृदयाशी संबंधित आजार होते आणि ७ वर्षांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती. रविवारी (दि. १५) अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि सायंकाळी ६.३०च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

 

नासिर फराज यांचे मित्र आणि गायक मुजतबा अजीज नाजा यांनी नासिर फराज यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे.

 

नासिर फराज यांनी २०१० साली रिलीज झालेल्या काइट्स चित्रपटातील ‘दिल क्यूँ मेरा शोर करे’, ‘जिंदगी दो पल की’ ही दोन सुपरहिट गाणी त्यांनी लिहिली होती. याशिवाय नासिर यांनी बाजीराव मस्तानी, क्रिश आणि काबिल यांसारख्या चित्रपटांसाठी देखील गाणी लिहिली होती.

 

२०१३ मध्ये रिलीज झालेल्या ‘एक बुरा आदमी’ चित्रपटात त्यांनी गीतकार म्हणून काम केले होते. नासिर फराज यांनी ‘तुम मुझे बस यूं ही’, ‘मैं हूं वो आसमान’, ‘कोई तुमसा नहीं’, ‘काबिल हूं’ आणि ‘चोरी चोरी चुपके’ या सारखी हृदयस्पर्शी गाणी लिहिली होती. ते उत्तम गीतकार आणि संगीत दिग्दर्शक म्हणूनही परिचीत होते. त्यांच्या अकाली निधनाने मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

 

Edited By - Ratnadeep Ranshoor



from मनोरंजन https://ift.tt/3NZ5mLJ

Post a Comment

Previous Post Next Post