https://ift.tt/RL07UZI
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Qg6lndB
म. टा. प्रतिनिधी, पुणे 'व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षा व सामाइक प्रवेश परीक्षेचे (सीईटी) प्रत्येकी ५० टक्के गुण ग्राह्य धरून पदवी प्रवेशाचा नवा फॉर्म्युला तयार करण्याचा मानस असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी रविवारी सांगितले. विद्यार्थ्यांनी 'सीईटी'प्रमाणेच बारावीच्या परीक्षेलाही गांभीर्याने घ्यावे, यासाठी हा 'फॉर्म्युला' तयार करण्याबाबत विचार सुरू आहे,' असे सामंत यांनी स्पष्ट केले. बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाला सामंत यांनी रविवारी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षणामध्ये 'कृषी'चा समावेश व्हावा, यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार आदी या वेळी उपस्थित होते. 'बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटीच्या गुणांना महत्त्व दिले जाते. यामुळे विद्यार्थी वर्षभर बारावीऐवजी सीईटीकडे अधिक लक्ष देतात. यामुळे बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला फारसे महत्त्व उरत नाही. या संदर्भात अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारकडून एका समितीची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला असून, त्या अहवालावर चर्चा सुरू आहे. अहवालात करण्यात आलेल्या शिफारशीनुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देताना बारावीच्या गुणांना ५० टक्के आणि सीईटीच्या गुणांना ५० टक्के महत्त्व द्यावे, असा फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र, या फॉर्म्युल्याबाबत कृषी महाविद्यालयांचे एकमत अद्याप झालेले नाही. यामुळे यावर विचार सुरू आहे,' असे सामंत यांनी सांगितले. महाविद्यालयांकडून शुल्क भरण्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या कारवायांबद्दलही सामंत यांनी स्पष्टीकरण दिले. 'कोणत्याही महाविद्यालयाने एकाच वेळी शुल्क आकारण्याचा तगादा लावू नये. पाच ते आठ हप्त्यांमध्ये शुल्क भरण्याची व्यवस्था करावी; तरीही काही महाविद्यालये ऐकत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. शुल्क आकारणीच्या संदर्भात स्वतंत्र समिती असून, निवृत्त न्यायाधीश या समितीचे प्रमुख आहेत. त्यांच्याद्वारे शुल्काबाबतीत होणारे वाद टाळता येतील,' याकडे सामंत यांनी लक्ष वेधले. --- 'परीक्षा ऑफलाइन घ्याव्या लागतील' 'राज्यातील अनेक विद्यार्थी ऑनलाइन परीक्षांची मागणी करीत असले, तरी आपल्याला शिक्षणाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने ऑफलाइनकडे वळावेच लागेल. यापुढे सर्व परीक्षा ऑफलाइनच होतील, असा आमचा आग्रह राहील,' असे सामंत यांनी स्पष्ट केले. - सीईटीमुळे बारावीचा अभ्यासक्रम आणि परीक्षेकडे विद्यार्थी दुर्लक्ष करीत आहेत. बारावीच्या परीक्षेचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. यामुळे भविष्यात बारावी आणि सीईटी अशा दोन्ही परीक्षांना विचारात घेऊन प्रवेशांसाठीचा नवा फॉर्म्युला तयार करावा लागेल. त्याबाबत विभागातर्फे चर्चा सुरू आहे. - उदय सामंत, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण विभाग
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Qg6lndB
Post a Comment