झुंड: नागराज मंजुळेंच्या आगामी चित्रपटाची कथा कशावर आधारित आहे, माहितीये?

https://ift.tt/pdVYHSL

सोशल मीडियावर सध्या नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.

हा चित्रपट येत्या 4 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

या चित्रपटात अमिताभ बच्चन हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर सैराट फेम आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांनीही या चित्रपटात काम केलं आहे. अजय-अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.

 

झुंडचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणावर या चित्रपटाविषयी आणि नागराज मंजुळेंच्या कामाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे मग झुंडची कथा कशावर आधारित आहे, सोशल मीडियावर काय चर्चा सुरू आहे, नागराज यांनी त्यांच्या मुलाखतींमध्ये काय सांगितलं आहे, ते आता जाणून घेणार आहोत.

 

विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट

 

'झुंड' ही एका निवृत्त क्रीडा शिक्षकाची कथा आहे, ज्यांची भूमिका अमिताभ यांनी साकारली आहे. हा शिक्षक झोपडपट्टीतील मुलांना शिस्तबद्ध सॉकर खेळाडू बनवतो.

 

'स्लम सॉकर' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे.

 

निवृत्त झाल्यानंतर विजय बारसे यांना 18 लाख रुपये मिळाले. त्या पैशातून काही जमीन खरेदी केली. त्यानंतर त्यांनी तळागाळातल्या मुलांसाठी एक फुटबॉलची अॅकॅडमी बनवण्याची योजना आखली, असं सांगितलं जातं.

 

विजय बारसे नागपूरच्या एका कॉलेजात क्रीडा शिक्षक होते. वंचित मुलांना भर पावसात प्लास्टिकच्या बादलीचा वापर करून फुटबॉल खेळताना पाहिल्यानंतर स्लम सॉकर सुरू करण्याचा विचार मनात आल्याचं विजय यांनी सांगितलं आहे.

 

झुंड आहे तरी काय?

झुंडविषयी एका मुलाखतीत नागराज यांनी सांगितलं, "झुंड ही एक अशा समूहाची गोष्ट आहे, जो सहजासहजी मिळणाऱ्या संधींपासून दूर आहे.

 

"यशाच्या मार्गावर किंवा संधी जिथं मिळते त्या मार्गापासून लांब असणारा हा समूह आहे. स्वत:च बिघडलेला असा हा एक समूह आहे आणि त्याची ही गोष्ट आहे."

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो चर्चेत

'झुंड'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. 3 मिनिटांचा हा ट्रेलर आहे. या ट्रेलरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेली फ्रेम पाहायला मिळत आहे.

 

या फ्रेममध्ये बाबासाहेबांसोबत शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि महात्मा फुलेही आहेत.

 

त्यामुळे या दृश्याची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. तसंच याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

झुंड चित्रपट मराठीत नाही केला कारण...

झुंड चित्रपटाच्या निमित्तानं नागराज मंजुळे आणि टीम यांच्या मुलाखती प्रसिद्ध होऊ लागल्या आहे.

 

एबीपी माझाच्या मुलाखतीत झुंड चित्रपट मराठीत का नाही केला, या प्रश्नाचं उत्तर देताना नागराज मंजुळे यांनी म्हटलं, "मग मी म्हणतो पुष्पा मराठीत का नाही केला किंवा तेलगूत का पाहिला, हिंदीत का पाहिलात. मी फेसबूकवर पण पाहतो, सोशल मीडियावर काही सेन्सिबल गोष्टींवर चर्चा होत नाही.

 

"पण मला ही गंमत वाटते मराठीत केला पाहिजे. मग बच्चन साहेबांनी पण मराठीत केला पाहिजे ना. बच्चन साहेबांनी मराठी शिकून मराठी भाषेत चित्रपट करता येईल इतरा रुबाब मराठी भाषेचा आणि दिग्दर्शकाचा म्हणजे माझा पाहिजे. त्यासोबत तेवढा वेळ पाहिजे. निर्मात्यांनी तेवढे पैसे दिले पाहिजे की बच्चन साहेब मराठीत चित्रपट करतील."

 

अमिताभ यांच्याबरोबर कामाचा अनुभव

झुंड हा नागराज मंजुळे यांचा पहिलाच हिंदी चित्रपट आहे आणि यात सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहे.

 

त्यामुळे अमिताभ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, हा प्रश्न आलाच.

 

याविषयी नागराज यांनी एका मुलाखतीत म्हटलं, "अमिताभ बच्चन कधीच त्यांना स्वत:ला तुमच्यावर लादत नाहीत. त्यांच्यासोबत काम करताना खूप शिकण्यासारखं आहे. कामाप्रती एवढं डेडिकेशन, या वयातला उत्साह चकित करणारा आहे. आयुष्यात चालत राहणं हा त्यांच्या आयुष्याचा सर्वोत्तम भाग आहे."

 

नागराज मंजुळे यांची चित्रपट कारकीर्द

नागराज यांच्या 'पिस्तुल्या' या पहिल्या लघुपटाला आणि त्यातील बालकलाकार सुरज पवार यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

 

त्यानंतर नागराज यांनी दिग्दर्शित केलेला फँड्री हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रचंड गाजला.

त्यानंतर 2016 मध्ये आलेल्या सैराट या चित्रपटानं तर देशभरात धुमाकूळ घातला. त्यावेळी सैराट हा सर्वाधिक कमाईचा चित्रपट ठरला होता.

 

आता झुंड हा नागराज यांचा हिंदीतला पहिला चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.

नागराज यांना त्यांचे चाहते प्रेमाने 'अण्णा' म्हणून हाक मारतात.

आता पुढे शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील चित्रपटाची तयारी करत असल्याचं नागराज यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं आहे.

 



from मनोरंजन https://ift.tt/jzL3afx

Post a Comment

Previous Post Next Post