विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! खासगी वैद्यकीय शिक्षण आता सरकारी शुल्कात

https://ift.tt/tiSUbZQ
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई खासगी वैद्यकीय कॉलेजांमध्ये आता सरकारी शुल्कात शिक्षण घेणे शक्य होणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (, ) याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. यानुसार खासगी वैद्यकीय कॉलेजांमधील ५० टक्के जागांवरील शुल्क हे सरकारी वैद्यकीय कॉलेजांच्या शुल्काएवढेच असावे, असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी खासगी कॉलेजांमध्ये दरवर्षी १० ते २५ लाख रु.पर्यंत शुल्क आकारले जाते. यामुळे अनेकांचा सरकारी कॉलेजमध्ये अवघ्या काही गुणांसाठी प्रवेश हुकतो व आर्थिक स्थिती नाही म्हणून अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहतात. अनेक विद्यार्थी बीडीएस, आयुर्वेद, युनानीसारखे पर्याय निवडतात. अशावेळी या विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने आयोगाने खासगी वैद्यकीय कॉलेजांतील ५० टक्के जागांवर सरकारी वैद्यकीय शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला देशातील खासगी वैद्यकीय कॉलेजांमधील ५० टक्के जागांचे शुल्क निश्चित करण्याचा अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा देशातील शेकडो गरीब विद्यार्थ्यांना होऊ शकेल. उर्वरित ५० टक्के जागांचे शुल्क निश्चित कसे करावे याबाबतही आयोगाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते किंवा उर्वरीत ५० टक्के जागांसाठीच्या शुल्कात आणखी वाढ होण्याची भीतीही जाणकारांनी व्यक्त केली आहे. आयोगाने गतवर्षी मे महिन्यात या मार्गदर्शक सूचनांवर जाणकारांकडून मते मागविली होती. यानुसार आत्तापर्यंत १८०० सूचना प्राप्त झाल्याचे समोर आले आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय होऊन विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LtgeKiR

Post a Comment

Previous Post Next Post