https://ift.tt/zjFV1pT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/d4ckGn5
म. टा. प्रतिनिधी, पुणे गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे पडलेल्या खंडानंतर यंदा दहावीची परीक्षा पुन्हा होऊ घातली आहे. मंगळवारपासून (१५ मार्च) या परीक्षांना सुरुवात होणार असून, त्यासाठीची सर्व तयारी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अडचणी येऊ नयेत, म्हणून 'शाळा तेथे केंद्र' अशी योजनाही आखली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा पहिला टप्पा म्हणून गणल्या जाणाऱ्या या परीक्षेच्या तयारीचा घेतलेला आढावा.... परीक्षेसाठी तासभर आधी पोहोचा दहावीच्या विद्यार्थ्यांचे केंद्र त्यांची शाळाच असल्याने या ठिकाणी परीक्षेच्या एक तास आधी पोहोचण्याचे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी, थर्मल स्कॅनिंग करण्यासाठी आणि सॅनिटायजरसारख्या सुविधा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी लवकर परीक्षास्थळी पोहोचावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अर्धा तास ज्यादा वेळ यंदा बारावीप्रमाणेच दहावीच्या विद्यार्थ्यांनाही पेपर लिहिण्यासाठी ज्यादा वेळ देण्यात आला आहे. ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास; तर ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी वीस मिनिटे देण्यात येणार आहेत. यामुळे सकाळच्या सत्राचा पेपर १०.३० वाजता; तर दुपारच्या सत्राचा पेपर ३ वाजता सुरू होणार आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाईल. दहा मिनिटे आधी त्यांना प्रश्नपत्रिका मिळतील. असे असेल प्रश्नांचे स्वरूप... दहावीच्या परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ पर्यायी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश असणार आहे. करोनाची पार्श्वभूमी आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण लक्षात घेता. प्रश्नांची काठीण्य पातळी सामान्य असेल, असेही राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ७५ टक्के अभ्यासक्रमांवरच प्रश्न दहावीच्या परीक्षेतील सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका या ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहेत. राज्य सरकारने वगळलेल्या २५ टक्के अभ्यासक्रमातील एकही प्रश्न विचारला जाणार नाही, असे राज्य मंडळाकडून सांगण्यात आले असून विद्यार्थ्यांनी केवळ ७५ टक्के अभ्यासक्रमावरच लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षकांनी मदत करावी ग्रामीण भागामध्ये एसटीचा संप सुरू असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी त्यांच्या शाळेत पोहोचण्यास अडचणी येऊ शकतात. अशा वेळी गावातील शिक्षक, राजकीय व्यक्ती आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे. दृष्टीक्षेपात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : १६ लाख ३७ हजार परीक्षा केंद्रांची संख्या : २० हजार ९८५ परीक्षेसाठी एकूण कर्मचारी संख्या : २ लाख ५० हजार पुणे विभागाची आकडेवारी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : २ लाख ७७,८१५ परीक्षा केंद्रांची संख्या : ३ हजार ३६२ एकूण कर्मचारी संख्या : सुमारे एक लाख परीक्षेची सर्व तयारी पूर्ण दहावीच्या परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाशिवाय अतिशय सकारात्मक विचार ठेवून परीक्षेला सामोरे जावे. परीक्षेत कोणीही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करू नये. बारावीच्या परीक्षेचे आयोजन यशस्वीपणे सुरू असल्याने दहावीची परीक्षाही सुरळीतपणे पार पडेल, याचा विश्वास आहे. - शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/d4ckGn5
Post a Comment