श्रीनरसिंह सरस्वती स्वामींचा जन्म वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड इथं झाला. तेथून पुढे ते औदुंबर इथं आले. औदुंबर ही अंकलखोपची वाडी आहे. भिलवडी, अंकलखोप आणि औदुंबर ही एक किमी परिसरात वसलेली गावं आहेत. असं म्हणतात की, या परिसरात नेहमी तपस्वींचा वावर असतो. या पवित्र वातावरणात कृष्णेत स्नान करून भाविक श्री दत्तगुरूंच्या विमल पादुकांचे दर्शन घेतात. श्रीदत्त पादुकांचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतांना बाजूच्या ओवऱ्यांमधून दत्तभक्त गुरुचरित्राचे पारायण करताना दिसतात. मंदिराच्या प्रांगणात औदुंबराच्या वृक्षाची सावली आहे. आकाशात सूर्य तळपत असता औदुंबर वृक्षाची सावली जमिनीवर अशी दिसते जणू रांगोळीच काढलेली आहे. मंदिरातून पायऱ्या चढून वर आल्यावर ब्रह्मानंद स्वामींचा मठ लागतो. हे स्वामी 1826 साली गिरनारहून औदुंबर येथे आले त्यांनी इथेच तपश्चर्या केली. नंतर त्यांनी इथेच समाधी घेतली. स्वामी ब्रह्मानंदांचे शिष्य स्वामी सहजानंद यांनी औदुंबराचा प्रशस्त घाट बांधण्याचे सत्कार्य केले. पवित्र औदुंबर क्षेत्री चैत्र मासात कृष्णामाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव, श्री नरसिंह सरस्वती जन्मोत्सव, श्री दत्तजयंती असे मोठे उत्सव साजरे केले जातात.
या तीर्थक्षेत्री कसे जावे?
एसटीने : औदुंबर क्षेत्री जाण्यासाठी सांगली एसटी स्थानकावरून नियमित एसटी सेवा आहे. सांगली-अंकलखोप या बसने इथे जाता येते. तासगाव-कोल्हापूर मार्गावर हे क्षेत्र आहे.
रेल्वे मार्ग : पुणे-कोल्हापूर मार्गावर भिलवडी रेल्वे स्थानक आहे. या स्टेशनवरून उतरून बस मार्गाने 8 किमी अंतरावर असलेले औदुंबर क्षेत्री जाता येते.
राहाण्याची सोय : या ठिकाणी राहाण्यासाठी धर्मशाळा देखील आहे. इथे भाविकांच्या राहाण्याची आणि जेवण्याची उत्तम सोय होऊ शकते.
from मनोरंजन https://ift.tt/2Rn7st9
Post a Comment