हर हर महादेव चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी असणार आहे. त्यातील एक प्रमुख भूमिकेतील नाव म्हणजे सुबोध भावे. या भूमिकेबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मनात आपसूकच आदराची आणि अभिमानाची भावना निर्माण होते. केवळ मराठी माणूसच नव्हे तर इतर भाषिकांसाठीही अखंड प्रेरणेचं उर्जास्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रयतेच्या राजाची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे असे मी मानतो. एक अभिनेता म्हणून आपल्याला कायम काही तरी आव्हानत्मक भूमिका करायला मिळाव्यात अशी कायम इच्छा असते. माझ्यासाठी ‘ड्रीम रोल’असलेली ही भूमिका केवळ आव्हानात्मकच नाही तर एक फार मोठी जबाबदारी आहे याची जाणीव मला आहे. हे शिवधनुष्य पेलण्याचा मी इमानेइतबारे प्रयत्न केलेला आहे. दिवसाअंती आनंद आणि समाधान देणा-या काही भूमिका असतात. या भूमिकेने मला तो आनंद ते समाधान आणि जगण्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन दिलाय. अभिजित देशपांडेचं कौशल्यपूर्ण दिग्दर्शन, अतिशय बंदिस्त पटकथा आणि झी स्टुडिओजमुळे लाभलेलं दर्जेदार निर्मितीमूल्य यांनी सज्ज झालेला हर हर महादेव हा चित्रपट मराठीसह इतर भाषांमधूनही प्रदर्शित होणार असल्याने आनंद द्विगुणीत झालेला आहे.”
हर हर महादेव चित्रपटाच्या भव्यतेबद्दल बोलताना झी स्टुडिओजचे व्यवसायप्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले की, “यंदाची दिवाळी ही आपल्या प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरावी अशी मनात इच्छा होती. हर हर महादेव या चित्रपटाच्या माध्यमातून ही पर्वणी आम्ही घेऊन येणार आहोत. छत्रपतींच्या कार्याचा त्यांच्या कर्तृत्वाचा महिमा हा केवळ राज्य आणि देशच नव्हे तर सातासमुद्रापार पोहोचलेला आहे. आभाळाएवढं कर्तृत्त्व असलेल्या आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास, त्यांची गोष्ट सादर होताना ती त्याच भव्यतेच्या तोलामोलाची असावी असा विचार कायम मनात होता. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचं कार्य अशाच भव्य दिव्य स्वरुपात आपण आणणार आहोत याचा विशेष आनंद आहे. यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम अहोरात्र झटत आहे. अनेक हॉलिवुड चित्रपटांवर काम केलेले नामांकित असे चारशेहून अधिक व्हिएफएक्स तंत्रज्ञ या चित्रपटावर काम करत आहेत हे विशेष. चित्रपटाची ही व्याप्ती लक्षात घेऊनच तो पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतला आहे.”
सुनिल फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित शिरीष देशपांडे यांनी केले आहे.
from मनोरंजन https://ift.tt/1DYOACe
Post a Comment