महेश कोठारेंनी एक रुपया देऊन लक्ष्मीकांत बेर्डेंना म्हटलेलं, 'माझ्या सिनेमाचा हिरो तू'

https://ift.tt/tMsVKWT

laxmiknt barde

 लक्ष्मीकांत बेर्डे हे नावं जरी ऐकलं तरी कोणत्याही मराठी प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर हसू उमटतं.

 

धुमधडाका, थरथराट, झपाटलेला, धडाकेबाज, अशी ही बनवाबनवी, एकापेक्षा एक... अशा अनेक चित्रपटांमधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेल्या साध्या, निरागस, काहीशा भोळसटपणाकडे झुकणाऱ्या व्यक्तिरेखा आजही आनंद देतात.

 

या भूमिकांमुळेच लक्ष्मीकांत बेर्डे प्रेक्षकांच्या इतक्या जवळ पोहोचले होते की, ते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी लक्ष्या बनले होते. रंगभूमीवरून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास सिल्व्हर स्क्रीनवर जाऊन स्थिरावला.

 

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954ला झाला होता. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे यांना पाच भावंडं.

 

कुटुंबाला हातभार लावण्यासाठी लक्ष्मीकांत यांनी काही छोटीमोठी कामंही केली होती. गिरगावात गणेशोत्सवामधल्या कार्यक्रमांमध्ये भाग घेताना त्यांना अभिनयाची गोडी लागली. पुढे अभिनयातच करिअर करावं हा विचार त्यांच्या मनात रुजला.

 

पण वडिलांनी त्यांना नोकरीला लावलं. याबद्दलचा किस्सा लक्ष्मीकांत यांनीच दूरदर्शन सह्याद्रीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.

 

"नोकरी मी एकच केली... ती पण एक महिना. मी मॅट्रिकला बसलो होतो. वडिलांना गॅरंटी नव्हती की मी पास होईन याची. त्यामुळे त्यांनी मला नोकरी लावून दिली. पण मला नोकरी करायची नव्हती, अभिनय करायचा होता."

 

नोकरीच्या या एका महिन्याच्या कालावधीबद्दल सांगताना लक्ष्मीकांत बेर्डेंनी सांगितलं की, नोकरीसाठी प्रवास करताना मी माणसं पाहायचो, टिपायचो. हिंदी सिनेमांतही वेगवेगळ्या भूमिका साकारताना मला त्याचा उपयोग झाला.

 

रंगभूमीवरून सुरुवात

नोकरी सोडल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डेंनी रंगभूमीवर काही नाटकांमधून भूमिका केल्या. संगीत नाटकं, बालनाट्य, अगदी एक तमाशापण केला होता. मात्र म्हणावं तसं यश त्यांना मिळालं नव्हतं.

 

पण त्यांच्या करिअरमध्ये खऱ्या अर्थाने माइलस्टोन ठरलं ते 'टूर टूर' हे नाटक. पुरुषोत्तम बेर्डे यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या नाटकात लक्ष्मीकांत यांचीही भूमिका होती. या नाटकाचे प्रयोग तर सुरू झाले, पण पहिले चाळीस-पन्नास प्रयोग म्हणावा तसा प्रतिसाद नव्हता.

 

आता आपल्याला अजून दहा-बारा वर्षं स्ट्रगल करावा लागणार की काय असा विचार लक्ष्मीकांत यांच्या मनात येत होता. पण पुरूषोत्तम बेर्डे यांच्या कल्पक जाहिरातींमुळे हळूहळू 'टूर टूर'चं नाव व्हायला लागलं, प्रेक्षक रंगभूमीपर्यंत यायला लागला. या नाटकाचे जवळपास पाचशे प्रयोगही झाले.

 

'टूर टूर' हे नाटक 1983 साली रंगभूमीवर आलं होतं. त्याच वर्षी लक्ष्मीकांत बेर्डे यांचं अजून एक नाटक रंगभूमीवर आलं- शांतेचं कार्टं. हे नाटकही गाजलं. त्याच वर्षी लक्ष्मीकांत बेर्डे यांना हसली तर फसली हा चित्रपट मिळाला, पण त्यांचा तो सिनेमा दुर्देवाने प्रदर्शितच झाला नाही. पण त्यामुळे लक्ष्मीकांत यांचा मराठी सिनेमातला प्रवेश काही थांबला नाही.

 

महेश कोठारेंचा तो शब्द

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साइन केलेला पहिला सिनेमा हसली तर फसली हा होता, पण त्यांचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट होता 'लेक चालली सासरला.' पण लक्ष्मीकांत बेर्डेंना खरी ओळख मिळाली ती महेश कोठारेंच्या 'धुमधडाका' या सिनेमातून.

 

'धुमधडाका' हा मल्टिस्टारर सिनेमा होता. अशोक सराफ, शरद तळवलकर, महेश कोठारे, निवेदिता जोशी, प्रेमा किरण अशी मोठी स्टारकास्ट होती. त्यात लक्ष्मीकांत बेर्डेंनी आपल्या भूमिकेचाही ठसा उमटवला होता.

 

"आम्ही 'झोपी गेलेला जागा झाला' हे नाटक करत होतो. बबन प्रभू यांनी केलेली भूमिका मी करत होतो. महेशनं त्यातलं माझं काम पाहिलं. त्याचवेळी त्यानं मला प्रॉमिस केलं की, 'लक्ष्या, मी जेव्हा सिनेमा काढेन तेव्हा तुला त्यात घेईन.' आमची ती पहिलीच ओळख होती. पण तो माझ्या कामावर जाम खूश होता. पण त्यानं ठरवून टाकलं होतं की, 'प्यार किये जा'वर सिनेमा करायचाय आणि त्यात मेहमूदचा रोल मी करणार. त्यावेळी त्याच्या सिनेमाचं नावही ठरलं नव्हतं.

 

पुढे जेव्हा महेशनं तो सिनेमा केला, तेव्हा महेश त्याचा शब्द विसरला नाही. मला चित्रपटात घेऊन त्यानं रिस्कच घेतली होती. पण ती व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला."

 

एक रुपया साइनिंग अमाउंट

महेश कोठारेंनीही हाच किस्सा माझा कट्टा या कार्यक्रमात सांगितला होता.

 

"माझे आई-वडील 'झोपी गेलेला जागा झाला' या नाटकात काम करत होते. बबन प्रभू गेल्यानंतर काही काळाने दिग्दर्शक आत्माराम भेंडे यांना हे नाटक त्यांच्या स्मरणार्थ पुन्हा करावं वाटू लागलं. तालमी सुरु झाल्या. बबन प्रभूंनी हे नाटक एका उंचीवर नेऊन ठेवलं होतं. त्यामुळे मला प्रश्न पडला की, आता हे नाटक कोण करतोय? बाबांनी सांगितलं की, एक नवीन मुलगा आहे. मस्त काम करतोय.

 

मी दुसऱ्या दिवशीच तालीम पाहायला गेलो. लक्ष्याला मी तिथं पाहिलं आणि मी लगेचच खिशातून एक रुपया काढून म्हटलं- लक्ष्या, हा एक रुपया... माझ्या पुढच्या सिनेमाचा हिरो तू. चित्रपट होता धुमधडाका."

 

लक्ष्यानंही तो एक रुपया घेतला आणि तो चित्रपटासाठी कमिटेड झाला, असंही महेश कोठारे यांनी सांगितलं होतं.

 

विशेष म्हणजे हा रुपया दिल्यानंतर दोन वर्षांनी हा सिनेमा आला.

 

1985 साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा जसा हिट झाला, तशीच महेश-लक्ष्या ही जोडगोळीही हिट झाली.

 

थरथराट, धडाकेबाज, दे दणादण, झपाटलेला, माझा छकुला, धांगडधिंगा, पछाडलेला असे अनेक हिट सिनेमे 'महेश-लक्ष्या'नं दिले.

 

लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे ही मैत्री ऑफस्क्रीनही तशीच होती. त्यामुळेच लक्ष्मीकांत हा माझा आत्मा आणि हृदय होता, असं महेश कोठारे म्हणतात.

 

लक्ष्मीकांतने माझ्यासोबत काम करताना कधीही पैशांबद्दल विचारलं नाही. तो कॉन्ट्रॅक्ट साइन करायचा आणि अमाउंट तू टाक असं म्हणायचा, असंही महेश कोठारेंनी सांगितलं होतं.

 

लक्ष्मीकांत गेल्यानंतरही प्रत्येक प्रोजेक्ट सुरू करताना तो माझ्या सोबत आहे, त्याचे गुडविशेस माझ्या बरोबर आहेत असंच मला वाटत असल्याची भावना त्यांनी 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.



from मनोरंजन https://ift.tt/3yQbsGn

Post a Comment

Previous Post Next Post