https://ift.tt/AOZk0uw
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BoxjYlR

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडून () इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी (MHT CET) परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाली. मात्र, परीक्षेचे वेळापत्रक अजूनही प्रसिद्ध झालेले नाही. त्यासोबतच एमबीए, एमसीए, लॉ, आर्किटेक्चर अशा महत्त्वाच्या अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश परीक्षेची नोंदणी आणि वेळापत्रक कधी जाहीर होणार, अशी विचारणा विद्यार्थी-पालकांकडून होत आहे. 'सीईटी सेल'कडून इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चर, एमबीए, एमसीए, लॉ (तीन आणि पाच वर्षे), बीएड, बीपीएड, आर्किटेक्चर अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी साधारण १६ सीईटी परीक्षा होतात. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी या पात्रता परीक्षेत गुण मिळवणे अनिवार्य असते. त्यामुळे परीक्षांची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहतात. त्यामुळे 'सीईटी सेल'ने या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार 'सीईटी सेल'ने इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षेसाठीची ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. मात्र, उर्वरित अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया; तसेच संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केलेले नाही. करोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वेळापत्रक विस्कळित झाले आहे. सीईटी परीक्षा उशिराने होत असून, त्याचा निकालही उशिराने जाहीर होत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया रेंगाळत असल्याचे चित्र आहे. शैक्षणिक वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी सीईटी परीक्षा वेळेत होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करून, विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी देता येईल. नोंदणी वेळेत पूर्ण झाल्यास, परीक्षा, निकाल, प्रवेश फेऱ्या असे टप्पे वेळेत पूर्ण होतील. विद्यार्थ्यांचे प्रवेश वेळेत झाल्यास, विद्यापीठे-कॉलेज वेळेत सुरू होऊन शैक्षणिक वर्ष सुरळीत होण्यास मदत होणार आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. '१४ मार्चनंतर अर्ज नोंदणी प्रक्रिया' करोनामुळे यंदा सीईटी परीक्षाच उशिरा झाल्या, त्यामुळे प्रवेश परीक्षा उशिरा सुरू झाल्या. 'सीईटी सेल'कडून चालू शैक्षणिक वर्षासाठी काही अभ्य़ासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशप्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्यामुळे आगामी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या सीईटी परीक्षांच्या नियोजन करण्याचे काम सुरू आहे. परीक्षांचे नियोजन करताना राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा, पदभरती परीक्षा, सार्वजनिक सुट्ट्या आदींचा विचार करून करावा लागतो, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. आगामी शैक्षणिक वर्षासाठी सर्व सीईटी परीक्षांसाठी अर्ज भरण्याची नोंदणी प्रक्रिया १४ मार्चनंतर सुरू करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत परीक्षांचे आयोजनही लवकर होईल. त्याबाबत योग्य सूचना 'सीईटी सेल'च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असे सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी सांगितले. 'सीईटी सेल'कडून एमएचटी-सीईटी परीक्षा यंदा जून महिन्यात घेण्याचे नियोजन सुरू आहे. इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा लवकर होतील. - रवींद्र जगताप, आयुक्त, सीईटी सेल
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BoxjYlR
Post a Comment