https://ift.tt/zYKqwVm
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/l8VXpUK
सुदाम कुंभार, निवृत्त प्राचार्य तथा समुपदेशक मंगळवारपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी (10th Exam 2022 Updates) २५ टक्के अभ्यासक्रम कमी आणि एकूण वेळेच्या बाबतीत विशेष सवलत देण्यात आली आहे. खरंतर ही परीक्षा भविष्यातील शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि त्यातून स्वीकारले जाणारे व्यवसाय यासाठी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची परीक्षा आहे. जवळ-जवळ दोन वर्षांच्या अंतराने आव्हानात्मक परीक्षेचा सर्व विद्यार्थी सामना करणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून जवळ-जवळ १६,२५,३११ इतके विद्यार्थी मंगळवार १५ मार्चपासून सुरू होणाऱ्या शालांत परीक्षेस (SSC Exam 2022) प्रविष्ट होत आहेत. गेल्या दोन वर्षांत काय अनुभवलं किंवा आपण काय शिकलो त्याचीसुद्धा ही एक परीक्षाच आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष शाळेत न जाता परीक्षेच्या वातावरणातील परीक्षा विद्यार्थ्यांना अनुभवता आली नाही. त्यामुळे कदाचित उद्यापासून सुरू होणारी परीक्षा किंवा परीक्षेचा पहिला दिवस हा काही प्रमाणात कठीण प्रसंग असू शकतो. या कठीण प्रसंगाला सर्व विद्यार्थ्यांनी सकारात्मकतेनं सामोरं जाणं आवश्यक आहे. गेल्या महिन्यात परीक्षा ऑफलाइन का ऑनलाइन याबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या विविध बातम्यांमुळे विद्यार्थी विचलित झाले होते. पण सर्वांनी शाळा आणि परीक्षा मंडळावर विश्वास ठेवून अत्यंत संयमाने या सर्व प्रकारांवर मात केली. बहुतांशी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या बालमनाला अस्वस्थ करणाऱ्या विविध बातम्या त्यांच्या कानावर पडलेल्या आहेत. मग त्यामध्ये अभ्यासाचा ताण आल्यामुळे घरातून निघून जाणं, स्वतःचं काही बरं-वाईट करुन घेणं, तासनतास युद्धाच्या बातम्या पाहताना अभ्यास विसरून जाणं. त्यामुळे कदाचित काही विद्यार्थ्यांना वेगळ्या ताणतणावालासुद्धा सामोरं जाण्याची वेळ आली असेल. पण शालांत परीक्षेदरम्यान संयमी राहणं आणि ताणतणावाचं व्यवस्थापन करणं हेच महत्त्वाचं आहे. परीक्षेदरम्यान ताणतणावाचं व्यवस्थापन करताना खालील काही मुद्दे समजून घ्या... - तणाव का निर्माण झाला ते जाणून घ्या. त्यापासून दूर कसं जाता येईल, याचा विचार करा. - आपल्या क्षमतेनुसार काम करा. आपल्या ताकदीबाहेरचं काम करू नका. त्यामुळे उगाचाच न्यूनगंड निर्माण होऊन तणाव वाढतो. - सतत काम करणं टाळा. विश्रांतीही घ्या. - रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणं टाळा. - गरजा कमी करा. - आकस्मिक घडणाऱ्या घटनांकडे शांत चित्ताने पाहा. - आधी आपल्याला काय साध्य करायचं ते ठरवा. त्यानुसार ताण न घेता ते साध्य करण्याचा प्रयत्न करा. - नेहमी सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचारांना कायम दूर ठेवा. - आपण सतत चिडत तर नाही ना, हे पाहा. मग त्यानुसार तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. - आपल्या मनाला समजवा. एखादी स्थिती तुमच्यामुळे उत्पन्न झाली की, दुसऱ्यांमुळे ते नक्की करा. ती स्थिती तुमच्यामुळे निर्माण झाली असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी शांततापूर्वक विचार करा. - तणावासंदर्भात तुमचे समुपदेशक, जवळचे मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी चर्चा करा. चर्चेने तणाव हलका होतो. - नियमित व्यायाम, योग, फिरणं, पोहणं, नृत्य यामुळे शरीर सैलावतं. तणाव कमी होतो. - एक दिनचर्या बनवा. प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ट वेळ द्या. - परीक्षेदरम्यान दैनंदिन आहारात बदल करू नका. - शाळा किंवा परीक्षा मंडळाने दिलेल्या सूचनांचं शिवाय इतर सूचनांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका. - जमल्यास काही दिवस समाज व प्रसार माध्यमांपासून दूर राहा. - सर्वात महत्त्वाचं, अभ्यासासाठी किंवा अभ्यासादरम्यान मोबाइलचा अतिवापर करणं इ. नकोच. शालांत परीक्षेची तयारी आणि ऑनलाइन शिक्षण यामध्ये बहुतांशी विद्यार्थी व पालकांची एकच शंका होती. ती म्हणजे, शिक्षण ऑनलाइन आणि परीक्षा मात्र ऑफलाइन. अर्थात, शंका रास्तच होती. आपण जे शिकलो ते परीक्षेच्या माध्यमातून आपण कशाप्रकारे कौशल्यपूर्ण रीतीने सादर करू शकतो हे पाहण्यासाठी आणि स्वत:ला ओळखण्यासाठी उद्यापासून सुरू होणारी परीक्षा ही आवश्यकच आहे. परीक्षा, परीक्षाकेंद्र, परीक्षेची वेळ इ. नियोजन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा विचार करूनच केलेलं आहे. तणावविरहित वातावरणात परीक्षेला सामोरं जा, यश तुमचंच आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/l8VXpUK
Post a Comment