"मला यावर्षी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक फोन येत आहेत. कारण त्यांना मला 'थलाइवी'साठी अवॉर्ड द्यायचं आहे."
कंगनाने पुढे लिहिलं आहे, "ते मला अजूनही नॉमिनेट करतात याचंच मला आश्चर्य वाटतं. पण कोणत्याही पद्धतीने भ्रष्ट व्यवहारांना प्रोत्साहन देणं हे माझ्या नैतिकते आणि मूल्यांविरोधात आहे. म्हणून मी फिल्मफेअरविरोधात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे."
2013 मध्ये फिल्मफेअरनं मला स्पष्टपणे सांगितलं होतं की, मी त्यांचा अवॉर्ड शो अटेंड केला नाही आणि तिथे डान्स केला नाही तर मला पुरस्कार मिळणार नाही, असंही कंगनाने म्हटलं आहे.
फिल्मफेअरविरोधात दंड थोपटणारी कंगना या आधीही आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत आली होती.
सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येसंदर्भात केलेले आरोप सिद्ध झाले नाहीत तर पद्मश्री पुरस्कार परत करेन, असं कंगनाने म्हटलं होतं. सुशांतने बॉलीवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली असा आरोप तिने केला होता.
'काय पो छे' सारख्या चांगल्या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या सुशांतला कोणताच पुरस्कार नाही मिळाला. छिछोरे, धोनी, केदारनाथ यांच्यासारख्या सिनेमांचं काहीच कौतुक नाही. गली बॉयसारख्या टुकार चित्रपटाला इतके अवॉर्ड मिळाले. आम्हाला तुमच्याकडून काहीच नको. तुमचे चित्रपट नको. पण आम्ही केलेल्या कामाचं कौतुक का केलं जात नाही?"
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना रनौतने ही प्रतिक्रिया दिली होती.
कंगनाची वादग्रस्त व्यक्तव्यं
कंगना रनौतने आपल्या 'जजमेंटल है क्या' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक पत्रकार परिषद घेतली होती.
प्रश्नोत्तरादरम्यान एका पत्रकाराने प्रश्न विचारण्यास सुरुवात केलीसुद्धा नव्हती इतक्यात कंगनाने त्याला थांबवलं, ती म्हणाली, "जस्टीन, तू तर आमचा शत्रू बनलास. बेकार गोष्टी लिहित आहेस. इतका वाईट विचार कसा करू शकतोस?"
हे आरोप ऐकून पत्रकाराने कंगनाला कोणत्या लेखाबाबत बोलत आहे, हे विचारलं. पण यावर कंगनाने स्पष्ट असं काही सांगितलं नाही. गोष्ट वाढत जाऊन वातावरण गढूळ बनलं. पण नंतर हा विषय थांबवण्यात आला.
यानंतर एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ऑफ इंडियाने कंगनावर बंदी घातली होती. पुढे मुंबई प्रेस क्लब, प्रेस क्लब आणि प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियानेही कंगनावर बंदी घातली. यानंतर कंगनाने ट्विटरवर दोन व्हीडिओ अपलोड करून मीडियावर निशाणा साधला आणि नोटीस पाठवली होती.
मुलाखतीत कंगनाला याबाबत विचारल्यानंतर त्या पत्रकाराने 'मणिकर्णिका' चित्रपटाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता असं सांगितलं. चित्रपट जिंगोइस्टिक(अति-राष्ट्रवादी) असल्याचा प्रचार तो करत होता त्यामुळे आपण त्याच्यावर नाराज होतो असं तिने सांगितलं.
गेल्या काही वर्षांत अशा प्रकारचे अनेक वाद कंगनाने आतापर्यंत ओढवून घेतले आहेत.
2009 मधल्या तिचं एक वक्तव्य पाहू, यात फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या मुली स्वतःला सेक्स ऑब्जेक्टच्या स्वरूपात सादर करतात. त्यांना अभिनयापेक्षा आपल्या दिसण्याची जास्त चिंता असते, असं वक्तव्य तिने केलं होतं.
त्यानंतर वेळोवेळी चालू विषयांवर कंगना व्यक्त झाली. दीपिका पदुकोन जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेल्यानंतर बोचरी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर सैफ अली खानने भारत संकल्पनेबाबत केलेल्या वक्तव्याचा तिने समाचार घेतला. तसंच सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांच्या निर्भया प्रकरणातील आरोपींना माफ करण्याच्या वक्तव्यावरसुद्धा तिने तिखट प्रतिक्रिया दिली होती.
अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर आंदोलनं सुरू झाली होती.
या विषयावर बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत कंगना सेलिब्रिटींवर तुटून पडते. कंगनाच्या मते, "फेअरनेस क्रिमची जाहिरात करणारे सेलिब्रिटी आता कृष्णवर्णीय लोकांबाबत बनावट सहानुभूती दाखवत आहेत."
शिवाय पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाल्यानंतर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती, हा मुद्दाही ती मांडते.
कंगनाने केलेल्या वक्तव्यांवर तिच्या समर्थनार्थ आणि विरोधातील अशा दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रियांचा खच पडलेला तुम्हाला पाहायला मिळेल.
करण जोहरची टीकाकार
कंगना करण जोहरवर सातत्याने टीका करते. याची सुरुवात 19 फेब्रुवारी 2017 रोजी करण जोहर यांच्या 'कॉफी विथ करण' कार्यक्रमातून होते. इथं तिने थेट करण जोहरच्याच कार्यक्रमात जाऊन त्याच्यावर अनेक टोमणे मारले होते.
या कार्यक्रमात करणच्या एका प्रश्नाला उत्तर देताना कंगना म्हणते, "जर माझं बायोपिक कधी बनवण्यात आलं तर तुम्ही(करण जोहर) नव्या लोकांना संधी न देणाऱ्या बॉलीवूडच्या टिपिकल बड्या व्यक्तीची भूमिका करू शकता. तुम्ही बॉलीवूडमध्ये नेपोटिझ्मचा फ्लॅग बिअरर (ध्वजवाहक) आणि मूव्ही माफिया आहात.
कार्यक्रमात हे ऐकून करण जोहर यांनी फक्त स्मितहास्य देऊन विषय बदलला. पण काही दिवसांनी त्यांनी याचं प्रत्युत्तर दिलं.
लंडनमध्ये पत्रकार अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत करण म्हणतात, "मी कंगनाला काम देत नाही, याचा अर्थ मी मूव्ही माफिया झालो असा होत नाही. तुम्ही महिला आहात, तुम्ही पीडित आहात, असं तुम्ही नेहमी सांगू शकत नाही. तुम्हाला बॉलीवूडमध्ये नेहमी धमकावलं जातं, असं तुम्ही प्रत्येकवेळी म्हणू शकत नाही. जर बॉलीवूड इतकंच वाईट आहे, तर ही इंडस्ट्री सोडून द्यावी."
खरं तर, करण जोहर यांची निर्मिती असलेल्या 'उंगली' चित्रपटात कंगनाने काम केलं आहे. पण हा चित्रपट आपल्या आयुष्यातला सर्वांत फ्लॉप चित्रपट होता, असं म्हणून या चित्रपटादरम्यानच आपले विचार पटत नसल्याचं लक्षात आल्याचं कंगना सांगते
भट्ट कँपने दिली संधी
कंगना बॉलीवूडच्या प्रस्थापितांना नेहमी लक्ष्य करते हे आपल्याला माहीत आहे. पण कंगनाला बॉलीवूडमधलाच एक प्रस्थापित गट असलेल्या भट्ट कँपने पहिली संधी दिली होती.
पहिली संधी मिळण्याची कहाणी कंगनाने एका मुलाखतीत सांगितली आहे. कंगना वयाच्या 16 व्या वर्षी हिमाचल प्रदेशातून बाहेर पडून चंदीगढला आली. तिथून दिल्लीत येऊन काही दिवस मॉडेलिंग केलं. पुढे तिला चांगल्या ऑफर मिळू लागल्या. काही महिने अस्मिता थिएटर ग्रुपमध्येही तिने काम केलं. नंतर मुंबईत दाखल होऊन चित्रपट क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी तिने अनेक ऑडिशन दिले.
त्यावेळी भट्ट कँपची निर्मिती आणि इमरान हाश्मीची प्रमुख भूमिका असलेल्या 'गँगस्टर' चित्रपटासाठी हिरोईनचा शोध सुरू होता. कंगनाने यासाठी ऑडिशन दिलं पण ती त्यावेळी जेमतेम 18 वर्षांची होती. या चित्रपटातील अभिनेत्रीला एका आईचं पात्रही वठवावं लागणार होतं. त्यामुळे ऑडिशनच्या वेळी दिग्दर्शक अनुराग बासू यांना कंगना या भूमिकेसाठी लहान असल्याचं सांगितलं. या भूमिकेसाठी चित्रांगदा सिंगचा विचार केला जात होता, पण ऐनवेळी चित्रपट करणं शक्य नसल्याचं तिने कळवल्यानंतर अखेर कंगनाची निवड करण्यात आली. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
पुढे भट्ट कँपसोबतच वो लम्हे चित्रपटातही कंगनाने काम केलं. यानंतर तिला चांगल्या-चांगल्या चित्रपटांचे ऑफर मिळू लागले. तिच्या फॅशन, क्वीन, तनू वेड्स मनू या चित्रपटांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
चित्रपट समीक्षक अजय ब्रह्मात्मज यांच्या मते, कंगनाने मिळालेल्या संधीचा चांगला फायदा करून घेतला. तिला तिच्या कामाबाबत पुरस्कारही मिळाले. पण काही काळानंतर तिला इंडस्ट्रीत दुजाभाव मिळाल्याचा अनुभव आला असेल. अशा वेळी काही अभिनेते शांत बसतात, काही इतर मार्ग पत्करतात. पण कंगनाने त्यावर प्रतिक्रिया देण्याचं ठरवलं.
"पण हे करत असताना कधी-कधी मार्ग चुकीचा निवडते. ती पीडितेच्या भूमिकेत जाते. विविध विषयांना स्पर्श करून शेवटी सगळ्या गोष्टींचा संबंध स्वतःशी जोडते. विनाकारण सगळ्या पत्रकारांना नावे ठेवते. यामुळे कंगनाची प्रतिमा वादग्रस्त बनली आहे," असं ब्रह्मात्मज यांना वाटतं.
from मनोरंजन https://ift.tt/ro23OJ1
Post a Comment