श्री बल्लाळेश्वर, पाली

https://ift.tt/8sqlrRM

ballaleshwar pali

बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वरओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता.

 

पौराणिक कथा

विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. तर मुद्गल पुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. फार प्राचीन काळी, म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बल्लाळ. बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा त्याचा गणेशमूर्तिपूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला. हळूहळू तो गणेशचिंतनात रमू लागला. त्याच्या मित्रांनाही गणेशभक्तीचे वेड लागले. बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेशमूर्तीचे भजन-पूजन करू लागला. बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरु झाली. लोक कल्याण शेठ्जीकडे जाऊन 'बल्लाळने आमच्या मुलांना बिघडविले' अशी तक्रार करू लागले.

 

आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्तिमार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेठजींना राग आला. त्या रागाच्या भरातच तो एक भलामोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेला. तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेशमूर्तीची पूजा करीत होता. सारेजण गणेशाचे भजन करीत होते. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता. ते पाहून कल्याण शेठजींच्या पायाची आग मस्तकाला गेली. तो ओरडत, शिव्या देतच तेथे धावला. त्याने ती पूजा मोडून टाकली. गणेशाची मूर्ती फेकून दिली. इतर मुले भीतीने पळून गेली; पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता. कल्याण शेठजीने बल्लाळास सोट्याने झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला; पण कल्याणला त्याची दया आली नाही. त्याने बल्लाळाला तशा अवस्थेच एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले. कल्याण शेठ रागाने म्हणाला, 'येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला. घरी आलास तर ठार मारीन, तुझा नि माझा संबंध कायमचा तुटला.' असे म्हणून कल्याण शेठ निघून गेला.

ballaleshwar pali

थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला. त्याचे शरीर ठणकत होते. तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला. ''हे देवा, तू विघ्ननाशक आहेस. तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस… ज्याने गणेशमूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा, बहिरा, मुका व कुष्ठरोगी होईल. आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करीन.'

 

बल्लाळाचा धावा ऐकून विनायक-गणेश ब्राह्मण रुपात प्रगट झाला. बल्लाळाचे बंध तुटले. त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, ''तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील. आता तुला हवा तो वर माग.''

 

तेव्हा बल्लाळ म्हणाला – ''तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी.''

 

तेव्हा गणेश म्हणाला – ''तुझ्या इच्छेनुसार मी इथे 'बल्लाळ विनायक' या नावाने कायमचे वास्तव्य करीन. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील.'' असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला. तीच शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.

 

मंदिर

या मंदिरात दगडी सिंहासनावर गणपतीची मूर्ती बसवण्यात आली आहे. पूर्वेकडे तोंड असलेली ही 3 फूट उंचीची मूर्ती स्वयंभू आहे आणि यामध्ये श्री गणेशाचे सोंड डावीकडे वाकलेले आहे. मूर्तीचे डोळे आणि नाभी हिऱ्यांनी जडलेली आहेत. श्री गणेश आणि रिद्धी-सिद्धी या दोघांच्याही मूर्ती आहेत ज्या चंवर लावत आहेत. ढुण्डी विनायक मंदिरातील गणपतीची मूर्ती पश्चिमेकडे आहे. असे म्हटले जाते की बल्लाळेश्वराचे प्राचीन मंदिर लाकडाचे बनलेले होते. नंतरच्या दगडाचा पुनर्बांधणीसाठी वापर केला गेला. मंदिराजवळ दोन तलावही आहेत. यापैकी एकाचे पाणी गणपतीला अर्पण केले जाते. असे म्हटले जाते की हे मंदिर उंचीवरून पाहिले तर ते देवनागरीचे श्री अक्षर असे दिसते. मंदिराच्या आत आणि बाहेर दोन मंडप बांधण्यात आले आहेत. बाह्य मंडप 12 आणि आतील मंडप 15 फूट उंच आहे. आतील मंडपात बल्लाळेश्वराची मूर्ती बसवली आहे. बाहेरील मंडपात, त्याच्या वाहनाच्या उंदराचा पंजेमध्ये मोदक दाबणारा पुतळा देखील आहे.

ballaleshwar pali

या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिर्‍यांपासून बनवले आहेत, गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत.



from मनोरंजन https://ift.tt/KAY07ZM

Post a Comment

Previous Post Next Post