MBBS Seats: खुशखबर! राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या ५२० जागा वाढल्या

https://ift.tt/EK6ovB9
म. टा. प्रतिनिधी, नाशिक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सुरू असलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेमध्ये राज्यभरात नवीन ५२० जागांची भर पडली आहे. सीईटी सेलमार्फत नुकतीच याबाबतची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, पदवी अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीमध्ये या नवीन जागांवर प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यानंतर संलग्नतेच्या कारणामुळे राज्यातील काही महाविद्यालयांमधील जागांवरील प्रवेशप्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. या महाविद्यालयांमार्फत जागा वाढवून देण्यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर काम सुरू असल्यामुळे पहिल्या फेरीची प्रवेशप्रक्रिया राज्यातील नऊ महाविद्यालयांना वगळून करण्यात आली होती. आता या नऊ महाविद्यालयांपैकी सात महविद्यालयांच्या प्रस्तावांना मान्यता मिळाल्यामुळे यांच्या जागा दुसऱ्या फेरीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच एका नवीन मान्यता मिळालेल्या महाविद्यालयातील जागांचा समावेशही या प्रक्रियेत करण्यात आला आहे. राज्यातील सात महाविद्यालयांच्या जागांमध्ये वाढ करण्यात आली असून, सहा महाविद्यालयांमधील जागा पन्नासने, तर एका महाविद्यालयातील जागा वीसने वाढविण्यात आल्या आहेत. विद्यापीठाची संलग्नता मिळालेल्या एका महाविद्यालयातील शंभर जागाही प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. एका नवीन महाविद्यालयामध्ये शंभर जागांना मान्यता देण्यात आली असून, राज्यभरात एकूण ५२० जागा आता प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीमध्ये समाविष्ट केल्या जाणार असल्याचे 'सीईटी सेल'मार्फत जाहीर करण्यात आले आहे. सहा मार्चपासून प्रक्रिया एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांची नावे व जागावाटपाची यादी ६ ते ८ मार्चदरम्यान प्रसिद्ध केली जाणार आहेत. या यादीतील विद्यार्थ्यांना १३ मार्चपर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. ३० मार्चपर्यंत एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे सीईटी सेलमार्फत जाहीर करण्यात आले आहे. दोन महाविद्यालयांचे प्रवेश स्थगित दुसऱ्या फेरीमध्ये राज्यातील विविध महाविद्यालयांतील जवळपास नऊ महाविद्यालयांमधील जागा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. परंतु, धुळ्यातील एसीपीएम महाविद्यालयाचे प्रकरण न्याप्रविष्ट आहे. कर्जतच्या तासगावकर मेडिकल कॉलेजला मान्यता मिळाल्याचा शासन अध्यादेश अद्याप प्राप्त न झाल्यामुळे या दोन्ही महाविद्यालयांमधील जागा दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठीही उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. महाविद्यालयेनिहाय जागांचा तपशील महाविद्यालय -- वाढलेल्या जागा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, सिंधुदुर्ग -- १०० राजीव गांधी मेडिकल कॉलेज, ठाणे -- २० डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, अमरावती -- ५० के. जे. सोमय्या मेडिकल कॉलेज, सायन -- ५० डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील मेडिकल कॉलेज, अहमदनगर -- ५० एन. के. पी. साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर -- ५० बी. के. वालावलकर रुरल मेडिकल कॉलेज, रत्नागिरी -- ५० तेरणा मेडिकल कॉलेज, नवी मुंबई -- १०० जेआययू इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जालना -- ५०


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qVGnME6

Post a Comment

Previous Post Next Post